विशेष मुलाखत : ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या मागणीपासून ते करुणा ‘सीक्यू’पर्यंत जगाच्या कल्याणासाठी कैलाश सत्यार्थी यांची ब्लूप्रिंट
हैदराबाद : जगात आर्थिक अवलंबित्वाचा वापर दुर्बळांना धमकावण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी एक शस्त्र म्हणून केला जात आहे, अशा परिस्थितीत गरिबी, मानवी दुःख, हवामान बदल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या मुलांची एकूण सुरक्षा आणि कल्याण यांसारख्या अधिक महत्त्वाच्या पण मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेल्या समस्यांवर एखादा एकमेव उपाय आहे का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते आणि शोषित व वंचित लोकांचा आवाज बनलेले जागतिक नेते कैलाश सत्यार्थी यांच्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती कोण असू शकते?
ईटीव्ही भारतचे निसार धर्मा यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत, सत्यार्थी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘करुणा: द पॉवर ऑफ कम्पॅशन’ या नवीन पुस्तकात करुणेला एक नवीन व्याख्या देण्याचा प्रयत्न कसा केला आहे, याबद्दल सांगितलं. मुलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या जागतिक कार्यतत्पर विचारवंतानं जगासमोर असलेल्या आव्हानांवर आणि समस्या सोडवण्यासाठी पर्यायी दृष्टिकोनाची गरज का आहे, यावर सविस्तर चर्चा केली.
मुलाखतीतील काही अंश :
निसार धर्मा : तुम्ही तुमच्या ‘करुणा : द पॉवर ऑफ कम्पॅशन’ या नवीन पुस्तकात ‘कम्पॅशन कोशंट’ किंवा ‘सीक्यू’बद्दल बोलता. आम्ही ‘इंटेलिजन्स कोशंट’ (IQ) आणि ‘इमोशनल कोशंट’बद्दलही ऐकलं आहे. हे ‘सीक्यू’ म्हणजे काय?
कैलाश सत्यार्थी : जग गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देत आहे. एवढी संपत्ती, ज्ञान आणि सामर्थ्य असूनही, लोक दुःखी आहेत आणि पर्यायानं आपली पृथ्वीही दुःखी आहे. या समस्यांवर शाश्वत उपाय काय असू शकतो? परिस्थिती अशी आहे की, जेव्हा जेव्हा एखादा उपाय सापडतो, तेव्हा त्यातून आणखी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
उदाहरणार्थ, लोक सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढवून गरिबी दूर करण्याबद्दल बोलतात, आणि मग सर्व धोरणे आणि कार्यक्रम त्याच दिशेने राबवले जातात. जीडीपी म्हणजे अधिक उपभोग, अधिक उत्पादन, ज्याचा अर्थ अधिक औद्योगिकीकरण. याचाच परिणाम म्हणून वसुंधरेला त्रास सहन करावा लागतो. उत्पादन आणि उपभोग वाढवण्यासाठी, आणि जीडीपी वाढवण्यासाठी खनिजे, पाणी, हवा आणि अशा सर्व संसाधनांचा वापर औद्योगिकीकरणासाठी केला जातो.
माझ्या लक्षात आलं की या सर्व गुंतागुंतीच्या समस्यांवर करुणा हाच उपाय आहे. माझ्या करुणेची व्याख्या वेगळी आहे. ती दया, कृपा किंवा सहानुभूती नाही. ती सहानुभूती किंवा समानुभूती देखील नाही. लोक या सर्व संज्ञा एकाच गटात टाकतात. पण मी करुणेच्या शक्तीची पुनर्व्याख्या केली आहे आणि तिला पुन्हा चैतन्य दिलं आहे. करुणा ही एक कोमल भावना, मूल्य किंवा सद्गुण नाही. करुणा ही एक अशी शक्ती आहे जी इतरांचे दुःख स्वतःचे दुःख मानून अनुभवण्यातून जन्म घेते. ती शक्ती व्यक्तीला जाणीवपूर्वक कृती करण्यास प्रवृत्त करते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, करुणा म्हणजे जाणीवपूर्वक समस्या सोडवणं. जेव्हा मी करुणा गुणांकाबद्दल (CQ) बोलतो, तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या सर्वांमध्ये करुणेची जन्मजात शक्ती असते. चेतना आणि करुणा या दोन दैवी देणग्या आहेत. परंतु आपल्या संगोपनासह, आपल्या शिक्षण प्रणालीमुळे आणि सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय वातावरणामुळे आपण अनेक कारणांमुळे करुणेपासून दूर जात राहतो. आपण करुणेची परिवर्तनकारी शक्ती गमावली आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही प्रमाणात करुणा असल्यामुळे, आपण ती मोजू शकतो आणि वाढवू शकतो, आणि तिथेच CQ ची भूमिका येते. IQ आणि EQ हे खूप वैयक्तिक असतात, पण CQ तसा नाही. CQ चार घटकांद्वारे निश्चित होतो आणि ते घटक मोजता येतात.
पहिला घटक म्हणजे जागरूकता, इतरांच्या समस्या आणि दुःखाची दखल घेणे. दुसरा घटक म्हणजे जोडलेपणाची भावना. आपण एकमेकांशी जोडलेले असल्याची भावना अनुभवली पाहिजे, कारण मानवी संस्कृतीची संपूर्ण उत्क्रांती याच प्रवृत्तीमुळे झाली आहे. पण हे नातं खरं असलं पाहिजे. एकदा आपण ते स्थापित केलं की, आपण तिसऱ्या घटकाकडे जाऊ शकतो, जो म्हणजे भावना. इतरांच्या समस्या स्वतःच्या समस्या मानण्याची सखोल जाणीव आणि चौथा घटक म्हणजे कृती. जेव्हा तुम्ही पहिले तीन घटक साध्य करता, तेव्हा ते एका शक्तीकडे, एका कृतीकडे घेऊन जातात, जी समस्या सोडवणारी बनते.
करुणा ही एक शक्ती आहे, करुणा ही एक कृती आहे, करुणा म्हणजे समस्या सोडवणे. आपल्या सभोवतालच्या चुकीच्या गोष्टींवर आणि अन्यायावर प्रश्न विचारण्याची प्रचंड शक्ती करुणेमध्ये आहे आणि उत्तरे शोधण्यातही करुणा मदत करते. त्यामुळे CQ ही एक अगदी नवीन संकल्पना आहे. पण मला खात्री आहे की हा एक मोठा बदल घडवणारा घटक ठरेल. CQ आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंना लागू होऊ शकतो. मग तो जोडीदार निवडण्याचा वैयक्तिक निर्णय असो, किंवा कॉर्पोरेट जग आणि एखाद्याला नोकरीवर ठेवण्याचा निर्णय असो. भविष्यात CQ हा एक निर्णायक घटक असेल.
निसार : ‘करुणा : द पॉवर ऑफ कम्पॅशन’ हे पुस्तक तुमच्या गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या ‘दियासलाई’ या आत्मचरित्रापेक्षा वेगळं कसं आहे? या नवीन पुस्तकामागे प्रेरणा काय होती?
सत्यार्थी : ‘दियासलाई’मध्ये माझ्या संघर्षांसह, अपयशांसह आणि यशांसह, माझ्या संपूर्ण जीवनाचं दस्तऐवजीकरण केलं होतं आणि करुणाशक्तीच्या जोरावर मी जे काही साध्य करू शकलो ते सर्व त्यात होतं. माझ्या लक्षात येऊ लागलं की, केवळ मीच नाही, तर असे हजारो लोक आहेत ज्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणलं, ज्यांनी न्याय, समानता, शांतता आणि शाश्वततेसाठी लढा दिला. त्यांची प्रेरक शक्ती देखील करुणाच होती. माझा विश्वास आहे की जगातील सर्व धर्मांचा उगम करुणेच्या त्या ठिणगीतूनच झाला आहे. जगातील सर्व धार्मिक नेत्यांनी जनसामान्यांचं दुःख स्वतःची समस्या मानली; ते शांत बसले नाहीत. ते हताश झाले नाहीत. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी इतरांचं दुःख कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेतले आणि कृती केली.
त्याचप्रमाणे, सर्व क्रांती आणि सामाजिक परिवर्तनं करुणेच्या ठिणगीतूनच जन्माला आलं आहे. मला वाटलं की आज जगाला करुणेची गरज आहे. आणि हे एक कारण होतं की मी माझ्या अनुभवांवर आणि इतर लोकांच्या अनुभवांवर आधारित माझे काही विचार शब्दबद्ध केले. माझ्या हेही लक्षात आलं की, जर आपण करुणेची पारंपरिक व्याख्या घेतली, तर लोकांना वाटेल की ही केवळ दयाळूपणा, एक चांगला मानवी गुण आहे.
करुणा ही एक परिवर्तनकारी, गतिशील आणि क्रांती घडवणारी शक्ती आहे. इतर कोणत्याही मार्गानं आपण अन्यायाच्या खोलवर रुजलेल्या समस्या सोडवू शकत नाही. मग तो लैंगिक किंवा वांशिक भेदभाव असो, किंवा जगभरात पद्धतशीरपणे पसरत असलेला द्वेष आणि हिंसाचार असो. आपल्याला करुणेची ही नवीन कल्पना एक शक्ती म्हणून, एक कृती म्हणून स्वीकारली पाहिजे. हे पुस्तक याच कल्पनेची व्याख्या करतं. मला असंही वाटतं की आत्म-करुणेची गरज आहे. विशेषतः अशा जगात जिथे दर ६ पैकी १ व्यक्ती तणावग्रस्त आहे, नैराश्याने किंवा तत्सम आव्हानांनी त्रस्त आहे. आत्म-करुणा आपल्याला आपला आंतरिक सर्वोत्तम मित्र शोधण्यात खूप मदत करू शकते. असा मित्र जो आपल्याला वस्तुनिष्ठपणे आपल्या समस्या शिकण्यास आणि त्या सोडवण्यास मदत करू शकेल. त्यानंतर कौटुंबिक करुणा आहे, जी आपल्याला आपल्या कुटुंबासोबतचे संबंध सुधारण्यास मदत करू शकते, विशेषतः या तीव्र स्पर्धेच्या आणि घसरत चाललेल्या कौटुंबिक मूल्यांच्या काळात.
निसार : तुम्ही करुणा आणि करुणामय समाजाबद्दल इतक्या ठामपणे बोलता. तरीही, आजच्या जगात आपण जवळजवळ दररोज पाहतो की शक्तिशाली राष्ट्रे लहान राष्ट्रांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि आपल्या तरुण पिढीसमोर चांगली उदाहरणे ठेवत नाहीत. अशा जगात वाढल्याने आणि हे वर्तन पाहिल्यानं मुलांच्या करुणेच्या समजावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का?
सत्यार्थी : चांगले नेते आहेत. धार्मिक संस्थांमध्ये, राजकारणात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये चांगले नेते आहेत. खूप कमी आहेत, पण ते निश्चितपणे आहेत. पण त्यांचा आवाज तितका मोठा नाही. आपण म्हणतोच की, वाईट गोष्ट खूप वेगाने पसरते आणि सर्वात मोठा बोलबाला अशाच गोष्टींचा होतो. दुसरीकडे, चांगुलपणा आणि सद्गुण कदाचित मंद आणि शांत असतात. आपल्याला अशा नेत्यांना शोधून काढावे लागेल.
तरुण पिढीवर परिणाम होत असल्याबद्दल तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही बरोबर आहात. ही लाजिरवाणी गोष्ट नाही का की, जागतिक स्तरावर 473 दशलक्ष, म्हणजेच 47 कोटींहून अधिक मुले युद्धप्रवण भागात किंवा संघर्षाने प्रभावित भागात राहत आहेत. कोणत्याही युद्धासाठी ते जबाबदार नाहीत, तरीही तेच सर्वात जास्त त्रास भोगत आहेत. गाझामध्ये मारल्या जाणाऱ्या मुलांचा काय दोष आहे? कधीकधी ते भुकेने मरतात. अन्न तिथे असते, पण अन्नाचे ट्रक थांबवले जातात. ते जखमी होतात, आजारी पडतात, पण त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचत नाहीत. त्यांचा काय दोष आहे?
प्रौढ लोक जे करतात त्याची किंमत मुलांनी चुकवू नये. प्रौढांनी करुणामय मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग निवडला पाहिजे. 13 कोटींहून अधिक मुले बालमजुरी आणि आधुनिक गुलामगिरीत खितपत पडली आहेत. त्यापैकी काहींना जनावरांप्रमाणे विकले आणि खरेदी केले जाते, अगदी जनावर विकत घेण्यासाठी लागणाऱ्या किमतीपेक्षाही कमी किमतीत. हा कोणाचा दोष आहे? हा आपला दोष आहे. ही कोणाची मुले आहेत? ती आपली मुले आहेत. ती तुमची मुले आहेत, ती माझी आहेत.
जोपर्यंत करुणा आणि नैतिक जबाबदारीची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत, मला माफ करा, पण कोणतीही योजना, कोणताही कायदा, कोणतेही प्रवचन या मुलांचे आणि त्यांच्या बालपणाचे संरक्षण करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला करुणेचे जागतिकीकरण करावे लागेल. आपण बाजारपेठा, अर्थव्यवस्था, डेटा आणि माहितीचे जागतिकीकरण केले आहे. आपण अगदी अतिरेकीपणा आणि जातीयवादाचेही जागतिकीकरण केले आहे. पण माझा विश्वास आहे की आता करुणेचे जागतिकीकरण करण्याची वेळ आली आहे. जर भारत आणि भारतीय, ज्यांचा इतका महान इतिहास आहे, करुणेच्या जागतिकीकरणात पुढाकार घेऊ शकत नाहीत, तर दुसरे कोण घेऊ शकेल?
निसार : तुम्ही ‘सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशन’ (SMGC) वर काही प्रकाश टाकू शकाल का? ही तुमच्या मागील उपक्रमांपेक्षा वेगळी कशी आहे?
सत्यार्थी : ही नवीन चळवळ, ‘सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशन’, माझ्या मागील कामांवर आणि मी गेल्या काही वर्षांत जे शिकलो त्यावर आधारित आहे. माझ्या हे लक्षात आलं आहे की, आपल्याला एक शाश्वत आणि उपाय-केंद्रित दृष्टिकोन अवलंबणं आवश्यक आहे. मुलांच्या समस्यांचं निराकरण एकाकीपणे करता येणार नाही.
जेव्हा जग जळत आहे, जेव्हा लोक कोणत्याही कारणाशिवाय एकमेकांशी भांडायला तयार आहेत आणि त्याची किंमत मुलांना चुकवावी लागत आहे, तेव्हा आपण एका व्यापक उपायाचा शोध घेणं आवश्यक आहे. मला हे दिसून आलं की, करुणेसाठी जागतिक चळवळ सुरू करून हे शक्य आहे. गेल्या दीड वर्षात एसएमजीसीला (SMGC) व्यापक पाठिंबा मिळाला आहे. याला शांततेच्या तसंच इतर क्षेत्रांतील अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांकडून आणि जागतिक नेत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. मला खात्री आहे की, आपलं जग सध्याच्या गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे.
लोकांनी, अगदी तरुणांनीही, याला (एसएमजीसीला) प्रतिसाद दिला आहे. मी नेहमी म्हणतो की, तरुणांमध्ये उत्कटता आणि करुणा या दोन्ही गोष्टी भरलेल्या असतात, ज्यांचा उपयोग चांगलं जगा बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. मी जिथे जिथे विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये बोललो, तिथे मी करुणेची व्याख्या निःस्वार्थ, सजग समस्या-निवारण अशी केली, ती त्यांना आवडली. ही काही धार्मिक संकल्पना नाही. करुणा धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक नेते आणि धार्मिक संस्थांना कदाचित असं वाटतं की ते करुणेचा उपदेश करत आहेत आणि तेवढे पुरेसे आहे. जर ते उपदेश करत असलेल्या करुणेनुसार वागत नसतील, तर त्यांचे प्रयत्न पोकळ ठरतात. केवळ उपदेश केल्यानं कोणतीही समस्या सुटणार नाही. करुणा म्हणजे उपदेश करणं किंवा शिकवणं नाही. मी करुणेचा शिक्षक किंवा उपदेशक नाही. मी तिला माझ्या जीवनाचा एक भाग बनवलं आहे. अत्यंत नम्रतेनं मी म्हणेन की, प्रत्येकामध्ये करुणेची शक्ती आहे; आपल्याला फक्त त्यावर चढलेले थर दूर करण्याची गरज आहे.
निसार : मी अलीकडेच सुनीता कृष्णन यांच्याशी बोललो, जे मानवी तस्करीविरोधी क्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव आहे. त्या म्हणाल्या की, तंत्रज्ञानामुळे मानवी तस्करांचा माग काढणं अधिक कठीण झालं आहे आणि तो एक चेहरा नसलेला गुन्हा बनत चालला आहे. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का? भारतात मानवी तस्करीची समस्या कशी विकसित होत आहे, असं तुम्हाला वाटतं?
सत्यार्थी : माझ्या धाकट्या बहिणी, सुनीता कृष्णनजी यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. त्या मानवी गुलामगिरी आणि तस्करीविरुद्ध लढणाऱ्या सर्वात धाडसी योद्ध्यांपैकी एक आहेत. मी त्यांच्याशी सहमत आहे. तस्करी हा एक संघटित गुन्हा आहे आणि त्यात अनेक शक्तींचा सहभाग असतो. मानवी तस्करी हा जगातील सर्वात फायदेशीर अवैध व्यवसायांपैकी एक आहे. हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय झाला आहे; केवळ दहशतवादच आंतरराष्ट्रीय नाही. तंत्रज्ञानामुळे तस्करी सोपी, आरामदायक आणि त्याचवेळी न दिसणारी झाली आहे. अदृश्य हात लहान मुली आणि मुलांना त्यांच्या पालकांकडून हिसकावून नेत आहेत. मानवी तस्करांना रोखण्यासाठी, त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी भारतात खूप काम करायचं आहे, आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करणं आवश्यक आहे. मानवी गुलामगिरी आणि तस्करीचे बळी ठरलेल्या अशा मुलामुलींसाठी आणि महिलांसाठी तंत्रज्ञान तारणहार ठरलं पाहिजे. तंत्रज्ञान केवळ संपत्ती जमा करण्याचं साधन बनून राहू नये. जर ते स्वातंत्र्य, सन्मान आणि प्रत्येकासाठी न्यायावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या हातात असेल, विशेषतः मुलामुली आणि समाजातील इतर असुरक्षित घटकांच्या हातात, तर ते एक शक्तिशाली साधन ठरू शकतं.
निसार : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपण ‘थांबवलेल्या’ सर्व युद्धांसाठी आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी वारंवार मागणी केली आहे. नोबेल पारितोषिक विजेते म्हणून, तुम्ही याकडे कसं पाहता? यामुळे या प्रतिष्ठित पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होते का?
सत्यार्थी : ही एक मजेशीर परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो की, गेल्या काही आठवड्यांपासून, एक भारतीय नोबेल शांतता पुरस्कार विजेता आहे हे कळल्यानंतर अनेक लोक मला ओळखू लागले आणि माझा आदर करू लागले. लोकांना नोबेल शांतता पुरस्काराचं महत्त्व कळलं, की तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापेक्षाही मोठा आहे, नाहीतर ते (डोनाल्ड ट्रम्प) त्याच्या मागे का लागले असते?
प्रत्येकजण चांगलं काम करून पुरस्कार मिळवू शकतो, पण ते अंतिम ध्येय नसावं. जेव्हा मला तो पुरस्कार मिळाला, तेव्हा लोकांनी मला सांगितलं की मी एक सेलिब्रिटी झालो आहे, शांतता पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय वंशाचा भारतीय. मी त्यांना सांगितलं की हा माझ्या आयुष्यातील फक्त एक स्वल्पविराम आहे. यामुळे मी काही खास व्यक्ती किंवा मोठा माणूस होणार नाही. मी माझ्या ध्येयासाठी काम करत राहीन आणि लढत राहीन. माझी इच्छा आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळावं, परंतु त्यासाठी वेगळा दृष्टिकोन, वेगळी मानसिकता आवश्यक आहे. मी त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व यशासाठी शुभेच्छा देतो.
निसार : २००४ मध्ये तुम्ही एका दगडाच्या खाणीतील तिसऱ्या पिढीतील गुलाम असलेल्या देवलीला आणि इतर अनेकांना वाचवलं होतं, त्या घटनेबद्दल तुम्ही पुन्हा सांगू शकाल का? जेव्हा तिनं तुम्हाला विचारलं, ‘तुम्ही आधी का आला नाहीत?’, तेव्हा तुमच्या मनात काय भावना आल्या होत्या?
सत्यार्थी : ती राजस्थानी बोलीभाषेत बोलली होती. ‘तू पहिले क्यूँ नहीं आयो’: हेच तिचे शब्द होते. जेव्हा ती तसं म्हणाली, तेव्हा मला वाटलं की माणूस म्हणून आपण अयशस्वी झालो आहोत. जर एकही मूल धोक्यात असेल, तर आपण स्वतःला सुसंस्कृत कसं म्हणू शकतो? जर एकही मुलगी गुलामगिरीत राहिली असेल, तर आपण जग स्वतंत्र आहे असं कसं म्हणू शकतो? आपण लोकशाहीबद्दल कसं काय बोलू शकतो? तेव्हा मला कळलं होतं की, हरियाणातील एका बेकायदेशीर दगडखाणीत काही कुटुंबांना वेठबिगार म्हणून ठेवण्यात आलं होतं. ती खाण एका खूप शक्तिशाली, राजकीय कुटुंबाची होती. त्या कुटुंबातील एक सदस्य खासदार होता. जेव्हा आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणताही सरकारी अधिकारी घटनास्थळी जायला तयार झाला नाही. त्या खाणीत कोणतेही वेठबिगार आहेत, हे त्यांनी पूर्णपणे नाकारलं. म्हणून आम्ही आमच्या पातळीवर योजना आखली, काही पाहणी केली आणि ठरवलं की आम्ही त्या कुटुंबांची पहाटे लवकर सुटका करू.
आम्हाला कळलं की, त्या दगडखाणीत काही मुलांचा जन्म झाला होता, त्यांच्या पालकांचं लग्न तिथेच झालं होतं आणि त्यांच्या आजी-आजोबांना राजस्थानमधून हरियाणात गुलाम म्हणून आणलं गेलं होतं. तीन पिढ्या. हे खूप धोकादायक होतं. पण मला अशा मोहिमा आवडतात. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी पहाटे लवकर जायचं ठरवलं, कारण आम्हाला माहीत होतं की खाणीची राखण करणारा बंदूकधारी माणूस पहाटेच्या वेळी तिथे नसतो. तो सकाळी जवळच्या गावात फ्रेश होण्यासाठी जायचा. आम्ही तिथे गेलो आणि ५० पेक्षा जास्त मुलं, स्त्रिया आणि पुरुषांची सुटका करू शकलो. आम्ही एक ट्रक आणि माझी गाडी आणली होती. म्हणून मी ६, ७ आणि ८ वर्षांच्या लहान मुलांना माझ्या गाडीत घेतलं. मी गाडी वेगाने चालवली, कारण मला त्या भागातून लवकर बाहेर पडायचं होतं, नाहीतर बातमी पसरली असती आणि आम्हाला मारलं असतं. ही सर्व मुलं खूप घाबरलेली होती. माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर काही केळी पडली होती, म्हणून मी मागच्या मुलांना केळी खायला सांगितली.
मागच्या सीटवरच्या मुलाने केळीच्या घडाला हात लावला, पण त्याला कळलं नाही की त्याचं काय करायचं. मग त्यानं तो घड इतर मुलांना दिला, जे आपापसात कुजबुजू लागले की ‘हा कोणत्या प्रकारचा बटाटा आहे?’ त्यांनी कधी केळी पाहिलीच नव्हती. जेव्हा मी त्यांना खायला सांगितलं, तेव्हा काहींनी सालीसकट केळी खाण्याचा प्रयत्न केला आणि लगेच थुंकून टाकलं. काहींनी खाल्ली, काहींनी नाही. त्यांनी कधीही गोड चवीची कोणतीही वस्तू खाल्ली नव्हती. मग अचानक, माझ्या खांद्यावर एक जड हात पडला. तो हात जड होता, कारण तो एका ८ वर्षांच्या मुलीचा (देवली) होता, जिला रोज हातोड्याने दगड फोडण्याचं काम दिलं जात होतं.
जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एकाचवेळी अनेक भावना दिसल्या. आपलेपणाची भावना, राग, तीव्र दुःख आणि अपेक्षा. तिनं विचारलं, ‘का हो. तुम्ही आधी का नाही आला?’ त्या मुलीने पाहिलं होतं की तिच्या वडिलांना बिडीने चटके दिले गेले होते, कारण त्यांनी आपल्या पत्नीवर, म्हणजेच त्या मुलीच्या आईवर होणारा बलात्कार थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तिनं हेही पाहिलं होतं की औषधोपचार न मिळाल्यानं तिचा लहान भाऊ तिच्या मांडीवर कसा मरण पावला. जेव्हा तिनं मला विचारलं की मी आधी का आलो नाही, तेव्हा मला रडू कोसळलं. तो माझ्यासाठी फक्त एक प्रश्न नव्हता; तर कायदा आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ते एक आव्हान होतं. हे कोणत्याही पवित्र पुरुषावर, पवित्र ग्रंथावर किंवा कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी एक आव्हान होतं. हे मानवतेसाठी एक आव्हान होतं. तुम्ही आधी का आला नाही? तुम्हाला कशामुळे थांबवलं?
निसार : तुमच्या कार्यामुळे जगभरातील व्यक्ती आणि संस्थांना प्रेरणा मिळाली आहे. बदल घडवू पाहणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन घडवणाऱ्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?
सत्यार्थी : फक्त कृतज्ञ राहा. तुम्ही तुमच्या पालकांपासून, तुमच्या भावंडांपासून, तुमच्या शेजाऱ्यांपासून, तुम्हाला मदत करणाऱ्यांपासून, मजूर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कारागीर, आपल्या जगण्यासाठी अन्न पिकवणाऱ्यांपासून आणि आपले कपडे शिवणाऱ्यांपासून सुरुवात करू शकता. चला, कृतज्ञतेची भावना विकसित करण्यापासून सुरुवात करूया. यामुळे नैतिक जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि अखेरीस करुणेद्वारे कृती केली जाईल. जर तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीपासून सुरुवात केली, तर तुम्ही राजकारणात प्रवेश करण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्याचा मार्ग निवडणाऱ्या अनेकांपेक्षा अधिक प्रामाणिक कार्यकर्ते व्हाल. मला वाटतं की प्रत्येक चांगला माणूस एक कार्यकर्ता असतो.
निसार : तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केला आहे का?
सत्यार्थी : आपल्यापैकी कोणीही राजकारणापासून मुक्त नाही. आपण एकतर सक्रिय राजकारणात असतो किंवा निष्क्रिय राजकारणात. मी सक्रिय राजकारणात आहे. माझं राजकारण पुढच्या निवडणुकीसाठी किंवा एखाद्या पदासाठी किंवा सत्तेसाठी नाही. माझं राजकारण पुढच्या पिढीसाठी आणि त्यानंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. राजकारणाचा उद्देश लोकांची सेवा करणं आणि त्यांना न्याय मिळेल याची खात्री करणं आहे. दुर्दैवानं, त्यानं आपला अर्थ गमावला आहे. राजकारण म्हणजे आता सत्तालालसा झाली आहे. माझं राजकारण हे आहे की आपल्याला मुलांसाठी, आणि त्यांच्या मुलांसाठी, आणि मग त्यांच्या मुलांसाठी काम करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ, तेव्हा आपण जगाला थोडं अधिक चांगलं बनवलं आहे या भावनेनं जावू.
निसार : तुमच्या लहानपणी शाळेबाहेर एका चांभाराच्या मुलाला पाहण्याच्या अनुभवापासून ते तुमच्या कार्यासाठी नोबेल मिळवण्यापर्यंत, आणि आजपर्यंत, कैलाश सत्यार्थी यांनी जे काही मिळवायचं होतं ते मिळवलं आहे का?
सत्यार्थी : अजून नाही. मला स्वतःसाठी काहीही मिळवायचं नव्हतं. पण हो, मला इतरांसाठी जे मिळवायचं होतं ते अजून मिळालेलं नाही. हा एक सतत चालणारा संघर्ष आहे, एक सततची लढाई आहे. काही सहमत आहेत, काही पाठिंबा देतात, काही असहमत आहेत आणि काही विरोधही करतात, पण लढाई सुरू आहे. माझ्या शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी डोळे उघडणारा होता, जेव्हा मी माझ्याच वयाच्या एका चांभाराच्या मुलाला आमच्या शाळेच्या अगदी बाहेर बसलेलं पाहिलं. मला निराशा वाटली. मी याबद्दल माझ्या शिक्षकांना, माझ्या पालकांना आणि इतरांना विचारलं. त्यांनी सर्वांनी मला पटवून देण्याचा प्रयत्न केला की, गरीब मुलांनी आपल्या कुटुंबाला मदत करणं ही काही असामान्य गोष्ट नाही. दररोज मी त्या मुलाला उघड्या आकाशाखाली काम करताना पाहत असे, कधी तो एकटा असायचा तर कधी आपल्या वडिलांसोबत.
एक दिवस मी हिंमत करून त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना त्याबद्दल विचारलं. वडील उभे राहिले, हात जोडून म्हणाले की, ते आणि त्यांचे वडील लहानपणापासूनच काम करत आले आहेत आणि त्यांचा मुलगाही तेच करत आहे. मग ते म्हणाले, “बाबूजी, तुम्ही लोक शाळेत जाण्यासाठी जन्माला आला आहात, पण आम्ही कामावर जाण्यासाठी जन्माला आलो आहोत.” हा एक विचारप्रवर्तक विचार होता जो माझ्या मनात आयुष्यभर घर करून राहिला. माझ्या लक्षात आलं की समाजात काहीतरी चुकीचं आहे. देव इतका अन्यायकारक असू शकत नाही. आम्हीच स्वतःला विभागलं आहे. मला काहीतरी करण्याची तीव्र गरज वाटू लागली, आणि ती भावना आजही कायम आहे.